*झाडे लावा, झाडे जगवा*
सामाजिक बांधिलकी जोपासत *"महाइकोसीस"* रोपं लावण्याचा संकल्प केला आहे. या कामी 'महाइकोसीस' पुढाकार घेत रोपं उपलब्ध करून दिली आहेत. आमच्या या कार्यात आपणही सहभागी व्हा- जास्तीत जास्त वृक्षारोपण करू, संवर्धन व संगोपण-संरक्षण करू... कारण हिच योग्य वेळ आहे, वृक्षारोपणासाठी....
आपल्या देशाच्या एकूण भूमीपैकी केवळ 11 टक्के क्षेत्रच जंगलाने व्यापलेले आहे. मोठ्या प्रमाणावर होणार्या वृक्ष तोडीमुळे जलवायू परिवर्तन घडून येत आहे. पर्यावरणातील या बदलांमुळेच भविष्यात देशातल्या काही भागांत पूरसदृश परिस्थिती तर काही भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होत आहे. एकूणच जागतिक तापमानात सतत होणारी वाढ लक्षात घेता यासाठी ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे.
जगातल्या अनेक देशांनी या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेत त्या दृष्टीने प्रयत्नही सुरू केले आहेत. ‘बिलियन ट्री’ अभियानात भारतासहित जगभरातील 166 देश सहभागी झाले आहेत. या अभियानांतर्गत वृक्षारोपण मोहीम राबवणार्या देशांच्या यादीत भारत आठव्या क्रमांकावर आहे. वृक्षारोपणात भारताला पहिल्या क्रमांकावर पोहोचवण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या सक्रिय सहभागाची गरज आहे.
गेल्या दशकात भारतात जितक्या झाडांचे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई करण्यासाठी 130 मिलियन हेक्टर क्षेत्रात वृक्षारोपण करण्याची आवश्यकता आहे. हे क्षेत्रफळ पेरू देशाच्या एकूण भूभागाइतके आहे.
जगभरातल्या देशांवर सध्या जलवायू परिवर्तनाचे संकट आहे.
कोपनहेगन इथे डिसेंबर 2009 मधे झालेल्या वैज्ञानिक परिषदेत जगातील 70 देशांचे जवळपास दोन हजारपेक्षा जास्त वैज्ञानिक सहभागी झाले होते. ग्रीन हाऊसमधून अत्याधिक प्रमाणात वायू उत्सर्जन होत असल्याने जगासमोर हे संकट उभे राहिले आहे. अशा अनेक कारणामुळे वैश्विक तापमानात सातत्याने वाढ होऊन पर्यावरणाचे चक्रही बिघडते आहे, आपण कल्पनाही करू शकत नाही इतक्या वेगाने तापमानात वाढ होत आहे आणि 2020 पासून याचे भयानक परिणाम दिसायला सुरुवात झालेली दिसते आहे. जलवायू परिवर्तनाच्या विनाशकारी परिणामांपासून वाचवण्यासाठी जनजागृती निर्माण करण्याचे काम रेडक्रॉस, रेड क्रिसेंट यांसारख्या जागतिक स्तरावरील संस्था करत आहेत. ‘जाणून घ्या धोक्याचा इशारा - वेळीच उपाययोजना करा,’ हे या संस्थांचे घोषवाक्य आहे. जगभरातील जवळपास शंभर मिलियन नागरिक समुद्रकिनारी वास्तव्य करतात, तापमानवाढीच्या दुष्परिणामांना याच लोकांना सगळ्यात आधी सामोरे जावे लागणार आहे.
भरपूर वृक्ष असलेल्या बागेत नियमित फिरल्याने, व्यायाम केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. तणावामुळे शरीरावर होणार्या नकारात्मक परिणामांचा प्रभावही कमी होतो. झाडे जितकी जास्त असतील तितक्या प्रमाणात श्वसनाशी संबंधित रुग्णांची संख्या घटेल, असे संशोधकांचे मत आहे. आपल्या आयुष्यात वृक्ष किती महत्त्वाचे आहेत, हे आपण जाणून घेतले पाहिजे ...
वृक्ष म्हणजे ऑक्सिजनचा कारखाना आहे.
कुटुंबातील चार सदस्यांसाठी एका वर्षभरात जितक्या ऑक्सिजनची आवश्यकता असते तितका ऑक्सिजन एक सामान्य आकाराचे झाड एका वर्षात निर्माण करते. जर तुम्ही घराच्या पश्चिम दिशेला एक झाड आज लावले तर तुमच्याकडील वीज वापरात पाच वर्षांत तीन टक्के कपात होईल.
झाडांकडे केवळ पाच मिनिटे एकाग्र चित्ताने पाहिल्यास मानसिक तणाव चुटकीसरशी नाहीसा होतो. रक्तदाब आणि शिरांनाही यामुळे आराम मिळतो, यावर आता संशोधना अंती शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
वृक्ष आहेत जीवनदायी...
झाडे स्वत: विष शोषून माणसाला जीवनदायी असलेला ऑक्सिजन बाहेर सोडतात. झाडांनी कार्बन डायऑक्साईड शोषून घेतल्यामुळे वातावरण स्वच्छ होते. रस्त्याच्या कडेला लावलेली झाडे प्रकाशरोधकाचे काम करतात. तसेच वृक्ष कर्मचा-यांचा उत्साह वाढवतात.
वृक्ष माणसांमध्ये आनंद आणि उत्साहाची भावना निर्माण करतात. कार्यालयाच्या परिसरात लावलेली झाडे जेव्हा तिथले कर्मचारी पाहतात तेव्हा त्यांचा काम करण्याचा उत्साह वाढतो, कार्यक्षमता वाढते.
झाडांकडे पाहण्यामुळे मनाला शांतता मिळते, मनावरचा तणाव कमी होतो. ज्या कार्यालयाच्या परिसरात अधिक झाडे लावलेली असतात, तिथले कर्मचारी खेळकर स्वभावाचे असतात, असे आता विज्ञानाने सप्रमाण सिद्ध केले आहे.
रोजगार निर्मितीमध्येही झाडांचे खूप मोठे योगदान आहे. इमारती, वर्तमानपत्रे, पुस्तके अशा पंधरा हजारांहून अधिक उत्पादनांसाठी कच्चा माल उपलब्ध होतो.
ध्वनी प्रदूषणाला नियंत्रित करण्याचे कामदेखील झाडे करतात. यासंदर्भात झाडे ही एक बॅरियरची भूमिका बजावतात.
वृक्ष आहेत संजीवनी...
दोन कोटी वृक्ष लावल्यास सव्वीस कोटी टन जास्त ऑक्सिजन मिळू शकतो. त्याचबरोबर हे दोन कोटी वृक्ष वातावरणातला एक कोटी टन इतक्या मोठ्या प्रमाणावरील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात.
पृथ्वीभोवतीचे संरक्षक कवच असलेल्या ओझोनच्या स्तरात दहा टक्के घट झाल्यास कॅन्सर होण्याच्या शक्यतेत पन्नास टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. त्यामुळे पर्यावरण वाचवण्यासाठी आपण आपल्या आयुष्यापेक्षाही जास्त झाडे लावली पाहिजेत.
झाडे ही स्थावर मालमत्तेची किंमतही वाढवतात.
इमारत आणि घराच्या आजूबाजूला लावलेल्या झाडांमुळे एअरकंडिशनरचा खर्च जवळपास पन्नास टक्क्यांनी कमी होतो. म्हणजेच झाडे ऊर्जा आणि पैसा दोन्हींची बचत करतात.
पाण्याला स्वच्छ ठेवण्याचं कामही झाडे करतात. पावसाच्या पाण्याचा प्रवाह हळुवार करून ते पाणी एक प्रकारे गाळण्याची प्रक्रियाही झाडांमार्फत होत असते.
झाडांची मुळं मातीला घट्ट धरून ठेवण्याचं काम करतात. पावसाच्या पाण्यामध्ये माती वाहून जाण्याला झाडाची मुळं प्रतिबंध करतात.
एका सामान्य झाडापासून दिवसभरात विस तास चालणार्या दहा एअर कंडिशनर्स इतका थंडावा असतो.
हे सर्व थांबवण्यासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त झाडं लावण्याची गरजेचे आहे तसेच प्रत्येक व्यक्ती ने झाडांचे महत्व समजून जास्तीत जास्त झाडे लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे व आपण सर्वांनी *झाडे लावा, झाडे जगवा* हा संदेश सगळ्यांपर्यंत पोहचवला पाहिजे.
Comments
Post a Comment