*भारतीय वृक्ष लावणे का गरजेचे आहे ?*
भारतीय उपखंडात आढळणारी वड, पिंपळ,कडुनिंब, उंबर, नारळ, इत्यादी यासारखी शतायुषी झाडे.
देशी आणि विदेशी वृक्ष असा जेव्हा वाद घातला जातो, तेव्हा हमखास केला जाणारा युक्तिवाद म्हणजे, विदेशी झाडे सावली देत नाहीत का? ती ही झाडेच आहेत मग त्यांचा काहीच उपयोग नसतो का? असे प्रश्न उपस्थित केले जातात. प्रत्येक जिवंत झाड हे झाडच असते, मात्र त्याचा स्थानिक पर्यावरणाला आणि त्यात असणार्या जैवविवीधतेला कितपत उपयोग होतो, हे पाहणे गरजेचे ठरते.
वृक्षारोपण करताना आणि देशी झाडे लावणे योग्य कि विदेशी झाडे लावणे, या 'देशी' शब्दाची साधी व्याख्या म्हणजे 'स्थानिक' अशीही होऊ शकते.
या खंड निर्मितीदरम्यान निर्माण झालेल्या भौगोलिक सीमा विविध प्रकारच्या नैसर्गिक बदलांना कारणीभूत ठरल्या. पुढे वेगवेगेळे झालेले खंड, आपापल्या सीमांमध्ये वेगवेगळी जैवविवीधता (बायोडायव्हर्सिटी) जोपासत समृध्द होत गेले. तिथल्या स्थानिक पर्यावरण, हवामान आणि भौगोलिकतेप्रमाणे या समृध्दतेची जोपासना होत गेली. हे स्थानिक हवामान आणि त्याच हवामानात जन्माने एकमेकांना पूरक बनलेली ही जैवविविधता दुसऱ्या खंडात नेऊन रुजवायचा प्रयत्न केल्यास ती पूरक ठरत नाही , याचे कारण त्या त्या खंडातल्या अथवा उपखंडातल्या स्थानिक वातावरणाशी ती संपदा अगदी एकरूप झालेली असते. निसर्गाच्या स्थानिक पर्यावरणात एकरूप होऊन एकमेकांना पूरक ठरणारी ही जैविक आणि वनसंपदा स्थानिक पातळीवर मात्र तितकी उपयोगी ठरत नाही. विशेषत: झाडांच्या बाबतीत हा प्रकार मोठया प्रमाणात होताना दिसतो.
एकाच खंडात आणि त्याच्या उपखंडात वाढणारी झाडे परिसरात परदेशी समजली जात नाहीत. त्यांचे निसर्गातले स्थान व त्यांची उपयुक्तता ही शतकानुशतके सिध्द झालेली असते. अशिया खंडात आणि भारतीय उपखंडात आढळणारी झाडे एकमेकांशी सुसंबध्द असतात. आपल्या खंडप्राय देशाच्या एका ठिकाणाहून आणून दुसरीकडे लावलेले झाड तिथे विदेशी ठरत नाही. मोठया प्रमाणात निसर्गवैविध्य जपणारा आपला देश आणि आसपासचा परिसर साधारण समान जातीच्या झाडांनी आणि वनस्पतींनी समृध्द आहे. जागोजागी त्या त्या वातावरणात, नैसर्गिक पध्दतीने रुजलेले, जोमाने वाढलेले वृक्ष म्हणजे स्थानिक वृक्ष अशी व्याख्या आपण करू शकतो. हे असे वृक्ष आपल्या जंगलात किंवा स्थानिक हिरव्या पट्टयात पर्यावरणाचा समतोल साधत असतात. त्यांच्या अस्तित्वाशी जुळवून घेतलेली, त्यावर जोपासली जाणारी सजीव व्यवस्था असते. या सजीव व्यवस्थेत मनुष्य, प्राणी-पक्षी किडे-किटक सामावलेले असतात. ह्या झाडांमुळे अन्न, वस्त्र व निवारा ह्या मानवी गरजा पुऱ्या होण्यास मदत होतेच, त्याशिवाय प्राणी- पक्ष्यांना, किडयांना-कीटकांनाही अन्न व निवारा मिळतो. या झाडांच्या सहकार्याने जगणारे अनेक जीव एकमेकांच्या सहकार्याने जगत असतात. झाडांच्या गळलेल्या पानांतून जमिनीवर जमणाऱ्या पाचोळयातून तयार होणाऱ्या खतातून जमिनीचा कस वाढत असतो. विघटन झालेल्या पालापाचोळयाच्या खतातून निर्माण होणारी पोषकद्रव्ये पुन्हा झाडाकडे पाठवण्याचे काम झाडांची दूरवर पसरणारी मुळे करत असतानाच खोलवर जाऊन ती जमिनीवरच्या मातीला धरून ठेवतात. विविध किटकांना, किडयांना आणि सरपटणाऱ्या जीवांना अशी उत्तम जमीन उपयुक्त ठरते आणि एक परिपूर्ण परिसंस्था निर्माण करते.
भारतीय उपखंडात आढळणारी वड, पिंपळ, कडुनिंब, उंबर, चिंच, नारळ इ. शतायुषी झाडे पिढयानपिढया वाढतात. अनेक देशी झाडांच्या आवतीभोवती असलेल्या पर्यावरणाला त्या झाडांचा मोठया प्रमाणात उपयोग होत असतो. देशी झाडांच्या फांद्या, ढोल्या या विविध पक्ष्यांचा निवारा असतात. विदेशी झाडांवर पक्षी शक्यतो घरटी करत नाहीत. कारण त्यांना ती झाडे परिचित नसतात. निव्वळ पक्षीच नाही, तर अशा झाडांवर फुलणाऱ्या रंगीत फुलांकडेही फूलं पाखरं कमी प्रमाणात दिसतात. झाड, त्यांची फुले, त्यातून होणारी परागक्रिया, पुढे होणारी फलधारणा ह्या सगळयांवर याचा परिणाम होत असतो. स्थानिक वनसंपदेशी आपली अर्थव्यवस्था काही प्रमाणात जोडलेली असल्याने या साध्या नैसर्गिक प्रक्रियेवर होणारा प्रत्येक परिणाम यावर अवलंबलेल्या अर्थव्यवस्थेला सुध्दा परिणाम करत असतो. स्थानिक वृक्षसंपदेतून उत्तम प्रकारे फळे, फुले, मुळे, लाकूड यासारखी वनोपज मिळत असल्याचे शतकानुशतके सिध्द झाल्याने त्यावर अवलंबलेले व्यवसाय तयार झाले आहेत. आपल्या पूर्वजांनी विविध झाडांचे महत्त्व ओळखल्याने त्यांना वाचवण्यासाठी धर्माची जोड देऊन त्यांना संरक्षित केले आहे. उदा. वडाच्या झाडाच्या परिसरात मिळणारा उत्तम प्राणवायू, त्याचे भक्कम किडरोधक लाकूड, त्याच्या पानांचा, सालीचा, पारंब्यांचा असलेला आयुर्वेदिक उपयोग, मुळांची जमिनीला धरून ठेवण्याची उत्तम क्षमता या सगळया उपयोगांना लक्षात ठेवून त्याला धार्मिक अधिष्ठान देऊन वडाला संरक्षण देऊ केले. तसेच उंबराच्या झाडाचे उत्तम लाकूड, खाण्यास योग्य फळे, जमिनीला धरून ठेवणारी मजबूत मुळे, साल, पान आदींचा असलेला आयुर्वेदिक उपयोग लक्षात घेवून याही झाडाला धार्मिक महत्त्व दिल्याने हे झाड वडासाखेच पूज्य झाले. पिंपळ, चिंच, कडुनिंब यासारख्या बहुगुणी झाडांचाही समावेश आहे.
भारतीय झाडे रुजायला, जगायला, फुलायला लागणारा काळ मोठा असल्याने विदेशी वृक्ष लावण्याकडे कल वाढला. त्यांची पटकन, जोमाने वाढणारे म्हणून कारणीभूत ठरले. मात्र विदेशी शोभेच्या वृक्षांच्या बेसुमार लागवडीने स्थानिक वनसंपदा अनेक ठिकाणांहून हद्दपार व्हायला लागली. साधारण अठराव्या शतकात, मादागास्कर येथून भारतात आलेल्या गुलमोहराने मुंबईत आगमन करून आज संपूर्ण भारत काबीज केला आहे. गुलमोहराला येणारी लालभडक फुले आकर्षक असतात, पण परिसरातील इतर झाडांचे पाणी खेचून घेण्याची करामत हे झाड करते. ऑॅस्ट्रेलियातून त्याच सुमारास भारतात आणल्या गेलेल्या निलगिरीच्या झाडाने आज हजारो एकरांवर आपल्या आम्लयुक्त पानांमुळे आजूबाजूला इतर स्थानिक झाडांचा जगण्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे. असेच झाड म्हणजे सुबाभूळ, या झाडाच्या अतिलागवडीने जमिनीचे वाजलेले तीनतेरा सर्वांना माहित आहे. पेल्ट्रोफोरम, अकेशिया, स्पॅथोडिया यासारखी झाडे निव्वळ शोभेसाठी लावताना या विदेशी झाडांमुळे बहुतांश ठिकाणी पर्यावरणाचा समतोल ढळल्याचे निदर्शनास आले असून कित्येक ठिकाणी तो धोक्याच्या पातळीवर येऊन पोहोचला आहे. दुसऱ्या खंडातून आलेली ही झाडे, वनस्पती कित्येकदा जणू आक्रमक होऊन स्थानिक वनस्पतींना जगू देत नाहीत. यामुळे स्थानिक जीवविविधतेची अर्थात बायोडायव्हर्सिटीची साखळी कमकुवत होत जाते. दक्षिण अमेरिकेतून आपल्याकडे आलेल्या गव्हाबरोबर तिकडचे पार्थेनियम गवताच्या बीच्या स्वरूपात आपल्याकडे आले आणि स्थानिक पर्यावरणात या तणाने हाहाकार माजवला. हे गाजर गवत आणि काँग्रेस गवत, पण ह्याचे निर्मूलन काही आपल्याला करता आले नाही. नीट विचार केला तर याचे कारण लक्षात येईल, ते म्हणजे हे स्थानिक तण नसल्याने त्याला खाऊन फस्त करणारे जीव इथल्या स्थानिक अन्नसाखळीत नसल्याने, त्याची बेसुमार वाढ झाली.
सध्या आपल्याकडे बेसुमार फोफावू दिलेली ही विदेशी झाडे, देशी झाडांचा जगण्याचा दर कमी करत असून त्याचे अतिशय दूरगामी परिणाम होताना दिसत आहेत. अनेक भारतीय झाडे ही विविध पक्ष्यांचा, किडयांचा नैसर्गिक अधिवास असल्याने, त्या झाडांच्या जागी विदेशी झाडे लावून आपण असे नैसर्गिक आसरे उद्ध्वस्त केले. अशा विदेशी झाडांवर होणाऱ्या परागण प्रक्रियेला आणि पक्ष्यांद्वारे होणाऱ्या बीजप्रसाराच्या कामाला खीळ बसत असून किटक, किडे, पक्षी, प्राणी जोडणारी निसर्गसाखळी कमकुवत होते आहे. याचमुळे निसर्गाच्या अन्नसाखळीत एकमेकांवर अवलंबून असलेले अनेक जीव नामशेष होण्याच्या मार्गावर ढकलले जात आहेत.
या सगळया प्रकाराला कुठेतरी आळा घालणे गरजेच आहे. कमी अवधीत जोमाने वाढणारी देशी झाडे पुरस्कृत करणे गरजेच आहे. कांचन, पांगारा, बहावा, शिरीष, काटेसावर, भेरली माड, हातगा, कदंब, सुरंगी, बोरं बाभळीची, अशोक यासारख्या झाडांची लागवड करून ती जोपासणे गरजेचे आहे. देशी वृक्ष, त्यांचे उपयोग, स्थनिक पर्यावरणात जैविक साखळीला मदत होइल अशी हरित संपदा निर्माण करणे ही काळाची गरज आहे. आज ऑॅस्ट्रेलियासारख्या देशाने स्वत:ची स्थानिक वनसंपदा जपण्यासाठी अतिशय कडक कायदे केले असून इतर खंडांतली हरित संपदा तिथे आणण्यास पूर्ण मज्जाव आहे.
अश्वत्थमेकं पिचुमंदमेकं न्यग्रोधमेकं दशचिंचिणीकम।
कपित्थबिल्वा मलकत्रयं च पंचाम्रवापी नरकं न पश्येत्।
अर्थात पिंपळ, कडुलिंब आणि वड यापैकी एक वृक्ष आणि चिंचेची दहा झाडे किंवा कवठ, बेल आणि आवळा यापैकी कोणत्याही जातीचे तीन वृक्ष आणि आंब्याची पाच झाडे जो लावेल, तो नरकात जाणार नाही. (म्हणजेच त्याचे वाईट होणार नाही.) अर्वाचीन काळात अतिशय समृध्द निसर्गात राहणारे आणि मर्यादित लोकसंख्या असणाऱ्या राष्ट्रात उपयुक्त झाडांचे महत्व जाणणारे सुज्ञ होते. आज त्याच राष्ट्रात स्थानिक वनसंपदा उपेक्षित झाली आहे.
चला तर , आपल्या आजूबाजूच्या परिसरात वेगवेगळ्या देशी झाडांची, आणि कमीत कमी फळे फुलांच्या जातीच्या वृक्षारोपण करून झाडांचे संरक्षण आणि संवर्धन करूया. जैवविवीधता राखण्यासाठी हातभार लावू, ही केवळ सरकारची जबाबदारी नाही हे निश्चित लक्षात घ्यायला हवे. जर प्रत्येक नागरिकांनी प्रयत्न पुर्वक फक्त जरी आपल्या परिसराचे रक्षण केले, तरी फार मोलाचे योगदान होवू शकते. त्यासाठी आपण आपली जाणीव पूर्वक जीवनशैली बदलली पाहिजे.
Comments
Post a Comment