*जागतिक पर्यावरण दिवस*


दरवर्षी 5 जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.
जगातील बदलत्या काळात पर्यावरणात वाढत चाललेला कार्बन डॉयऑक्साईड सर्वांच्या डोकेदुखीचा बनला आहे.
पर्यावरण शब्द ; सजीव-निर्जीव यांच्यामधील क्रिया-प्रतिक्रिया व आंतरक्रियांमधून साकार झालेली सजीवाच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय. पहिल्या महायुद्धानंतर मानवाच्या निसर्गावरील आघाताचे परिणाम शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. त्याचप्रमाणे औद्योगिक क्रांतीचे दूरगामी गंभीर परिणाम मानवाला भेडसावू लागले. 
सध्याचा विकसनशील देशांची वाढती अर्थव्यवस्था व ऊर्जेचा वाढता वापर तसेच विकसित देशातील दरडोई असलेला मोठ्या प्रमाणावरील वापर यामुळे ऊर्जेचा वापर कमी होणे शक्य नाही. त्यामुळे कोणत्या प्रकारच्या ऊर्जास्रोताने जागतिक तपमान वाढ होणार नाही, यावर समाधानकारक उत्तर सापडलेले नाही. 
- कोट्यवधी वर्षे पृथ्वीवरील कार्बनचे सरासरी प्रमाण संतुलित होते. पृथ्वीचे सरासरी तपमान आता 0.2 सें. ग्रे. प्रती वर्षाने वाढत राहणार आहे. 
कार्बन डाय ऑक्साईड व इतर उष्णता शोषणारे वायू कमी करण्याची 196 देशांच्या प्रमुखांनी एकत्र येऊन 12 डिसेंबर 2015 रोजी पॅरिस कराराला एकमताने मान्यता दिली. पॅरिस करारात मानवजात वाचवण्यासाठी नमूद केलेली 2 सें. ग्रे. ची धोक्याची पातळी आपण 2 ते 5 वर्षांत ओलांडत आहोत.  सामान्य नागरिकांना याचा अर्थ समजायला हवा. मानवजात व जीवसृष्टी वाचवण्याची ही शेवटची संधी आहे. या पुढे जगाचा विनाश फक्त दोन कारणाने होऊ शकतो, एकतर अणू युद्ध किंवा पर्यावरणाच्या बदलामुळे हे समजून घेतले पाहिजे. 

वायू प्रदूषणातील घटक नैसर्गिक चक्रातून पूर्णपणे काढून टाकता येत नसल्याने हे घटक मुख्यत्वे हवामान बदलास जबाबदार ठरत आहेत. तापमानवाढीमुळे, जमिनीतील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. विहिरी, तलाव, धरणे, नद्या आटत आहेत.  शेतीतील उत्पादन कमी होत आहे, वन्य व पाळीव पशु-पक्ष्यांना चारा पाणी मिळत नाही. वन्य प्राणी पाण्यासाठी शहरात येत आहेत. पशु-पक्ष्यांचे स्थलांतर होत आहे. उष्ण प्रदेश तयार होऊन भीषण दुष्काळ निर्माण होत आहे. पृथ्वीवरील जैवविविधतेतील जीव सृष्टी, पशू-पक्षी, वनस्पती, व इतर घटक नष्ट होण्यास सुरुवात झाली आहे. सर्व मानव जात आणि पशू पक्षी सुध्दा  यांना शारिरीक व मानसिक विकार, वागण्यातील बदल, तसेच जे आपल्याला माहीत नाही असे नवीन नवीन रोग उदयास येत आहेत. आरोग्यदायी जीवन नाहीसे होण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे आयुष्यमान कमी कमी होत आहे. चक्रीवादळांपासून वाळू व धुळींचे कण हे वादळ हजारो मैलांचा प्रवास करू शकतात, ज्यामुळे रोगकारक आणि हानिकारक गोष्टी देखील वाहू शकतात. ज्यामुळे तीव्र समस्या उद्भवू लागली आहे. 
जगातल्या 7.8 अब्ज लोक संख्येतून दरवर्षी सुमारे 7 दशलक्ष लोकां पेक्षा जास्त वायू प्रदूषणामुळे  मरतात, त्यापैकी 4 दशलक्ष लोकां पेक्षा जास्त आशिया-पॅसिफिक खंडातील मरण पावतात. आपल्या देशात तर या वर्षी जगात सर्वाधिक सुमारे 25 लाख माणसे वायूप्रदूषणाने बळी पडली.

जगातील जवळपास 100 पेक्षा जास्त देशामध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. यामागील मुख्य उद्देश्य इतकाच की, जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे असा आहे. जागतिक पर्यावरण दिवस- 2009 या वर्षाची संकल्पना ही बदलत चाललेले हवामान आणि वातावरणातील कार्बनचे प्रमाण याविषयीची आहे. 

जागतिक पर्यावरण दिवस वेगवेगळ्या पद्धती साजरा करता येऊ शकेल. जगातील प्रत्येक व्यक्तीने सहकार्य करुन वाढते कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होऊन ऑक्सीजनचे प्रमाण वाढण्यास नक्कीच मदत होईल. हवामान बदलातील फरक लक्षात घेता शितगृहातून निघणार्‍या क्लोरे-फ्लुरो कार्बन ( CFC) वायूचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे. पर्यावरणाविषयक जनजागृती करण्यासाठी आज सभा, संमेलने, चर्चासत्रांचे आयोजन करणे गरजेचे आहे. घनकचर्‍यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावणे, घातक वायू गळतीला आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करणे, कारखान्यांच्या धुरांड्यातून तसेच वाहनांमधून होणार्‍या उत्सर्जनाची रासायनिक तपासणी व त्यावरील उपाय यांचे काटेकोरपणे पालन करणे. नैसर्गिक ऊर्जा स्त्रोत व जीवाश्म इंधन डिझेल, पेट्रोल, रॉकेल, लाकूड, कोळसा, इ.. या प्राथमिक ऊर्जा स्त्रोतापासून विद्युत ऊर्जा तयार करतात, यास दुय्यम ऊर्जा असे म्हणतात. आज जगभरात ऊर्जा व पर्यावरणाचे संवर्धन करणे व प्रदूषण कमी करण्यासाठी सतत जागृकता वाढत आहे. म्हणून ही संकल्पना मोठ्या प्रमाणात स्विकारली जात आहे. कारण, प्रदुषणामुळे होणारे निसर्गाचे असंतुलन व बदल जसे की पृथ्वीचे प्रचंड तपमान, अतिथंडी, अवेळी पडणारा पाऊस व त्याचे कमी-जास्त प्रमाण, गारांचा पाऊस, ढग फूटी, महापूर, समुद्र पातळीत वाढ, त्सुनामी, सागरी वादळे, आकाशातील विजांचा गडगडाट व जमिनीवर पडण्यात सतत वाढ, भूकंप, दुष्काळ, रोगराई, अनेक नैसिर्गक अपघात, इ. तसेच प्रदूषणाच्या अधिक पातळीमुळे मानव व पशु-पक्षांच्या शारिरीक व मानिसक वर्तणुकीतील विकार व बदल, आणि जैवविविधता यांचे भरपूर नुकसान होत आहे.

सरोवरांचे संरक्षण व संवर्धन तसेच सरोवरातील वन्यजीवांचे संरक्षण व विकास यावर भर देऊन त्याचे महत्त्व जनमानसात पटवून देण्यासाठी चर्चासत्रे आयोजित करणे. नद्यांचे प्रदूषण शहरी सांडपाण्यामुळे होत असल्याने त्या विषारी बनत आहेत. त्यासाठी त्या ठिकाणी पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. पर्यावरण व प्रदुषणासंदर्भात केंद्र व राज्य शासनाने संमत केलेल्या अधिनियम व नियमावलीचे काटेकोर पालन करणे या प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबविल्यास आपण खर्‍या अर्थाने पर्यावरणाच्या समृद्धीचा दिशेने वाटचाल करु, यात शंका नाही.

सर्व सजीव जगण्यासाठी आणि निर्जीव वस्तू टिकवून राहण्यास सक्षम नसणे, या वातावरणातील विपरीत बदलास ‘‘पर्यावरण प्रदूषण’’ असे म्हणतात. ते वेगवेगळ्या माध्यमातून अनेक प्रकारचे असते. जसे रासायनिक, हरित वायू, भारी धातू, प्रकाश, ध्वनी, कीटकनाशके, आणि किरणोत्सर्गी, इ. याशिवाय माती, पाणी, वायु, रासायनिक शेती हे प्रदूषणाचे प्रमुख भाग आहेत. 

मानव निर्मित स्त्रोत खनिज खाणी व रिफायनरी, सिमेंट व लोखंड प्रकल्प, इमारतीची मोडतोड व बांधकाम. कचरा व सांडपाणी, शेतामधील कीटक नाशकांची फवारणी, वीज निर्मिती, वाहतूक आणि औद्योगिक वापरासाठी कोळसा, तेल, गॅस, इतर जीवाश्म इंधन जळणे आणि निसर्गनिर्मित अनेक नैसर्गिक अपघात, ज्वालामुखीय विस्फोट, जंगल वृक्ष  तोड, जंगलातील वणवे, चक्रीवादळांपासून वाळू व धुळींचे कण.

पर्यावरण दिनानिमित्त सुरुवात आपण आपल्या घरातून केली पाहिजे. पेपर, काचेच्या वस्तू, अल्युमिनियम, मोटर ऑईल इ. ह्याचा रिसायकलिंग करायला पाहिजे.   हातांनी जे काम करु शकतो ते काम इलेक्ट्रीक उपकरणाशिवाय करायला हवे. शक्य असल्यास गरम पाण्याऐवजी थंड पाण्याचा वापर करायला हवा. प्लॅस्टीक पिशव्यांऐवजी परत परत वापरता येणार्‍या कागदी पिशव्यांचा वापर वाढवला पाहिजे. पाण्याचा गैरवापर करणे थांबवले पाहिजे. घरातील रुम हिटरचा वापर न करता स्वेटर घालून इलेक्ट्रीक ऊर्जेचा वापर टाळायला हवा. गरज नसल्यास घरातील टी.व्ही., बल्ब तसेच अन्य इलेक्ट्रीक उपकरणाचा वापर  कमी करायला पाहिजे.  घरातून बाहेर पडताना पाण्याचा हिटर, पंखा, विजेचा दिवा बंद केले पाहिजे. 

आपला देश सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर असताना आपण पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करुन चालणार नाही. निसर्गावर अन्याय करतो हे आपण  सागरी वादळे, भूकंप, ढग फूटी, महापूर, दुष्काळ, रोगराई अशा अनेक नैसर्गिक प्रकोप याद्वारे जाणवला आहे. हे सर्व लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्तीने वरीलप्रमाणे उपक्रम राबविल्यास  पर्यावरणाचा समतोल राखून आपण खर्‍या अर्थाने समृद्धीच्या दिशेने वाटचाल करू शकतो.

Comments