पृथ्वी ही एक मोठी परिसंस्था
लोकांमधे झाडांबद्दल, पर्यावरण बद्दल जनजागृती निर्माण होणे फार महत्वाचे आहे.
मनुष्याने विकासाच्या नावाखाली स्वार्थाचा विचार केला. अतोनात वृक्षतोड केली, परिणामी जंगल, वन्यजीव कमी झाले. लाखो वर्षांपासून बनलेले पर्यावरण, हवामानात बदल झाला. नैसर्गिक आपत्तीत वाढ झाली. हे असेच सुरू राहिले तर सजीवच काय मानवालाही पृथ्वीवर राहणे कठीण होईल.
आपण पर्यावरण संरक्षणाचा विचार करताना केवळ मानवाचा विचार करून चालत नाही. अन्य सजीवांचाही विचार करायला पाहिजे. तसेच अजैविक घटक- जसे भूमी, खनिजे, पाणी, हवा आणि सूर्यप्रकाश यांची पर्यावरण संरक्षणात महत्त्वाची भूमिका आहे हे समजून घेतले पाहिजे. आपण आणि सर्व सजीव हे विविध परिसंस्थांत जगत असतात. अजैविक आणि जैविक घटक, त्याची आंतर्क्रिया आणि एकमेकावरील अवलंबिता मिळून परिसंस्था तयार होते. समुद्र, नद्या, जंगल(वृक्ष), जलाशये, वाळवंट, गवताळ प्रदेश, पर्वतीय प्रदेश इत्यादी परिसंस्था आहेत. अजैविक भूभागात ज्या विविध सजीव प्रजाती एकमेकांना सहकार्य करून राहतात, तिथे जैवविविधता वाढते. एक अन्नसाखळी तयार होते. प्रत्येक सजीवाला त्यांचे अन्न मिळते. तिथे एक व्यवस्था म्हणजेच परिसंस्था तयार होते. ती एकमेकांवर अवलंबून असते.
नदी, नदीची परिसंस्था
समुद्रापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या डोंगरातल्या जंगलातील वृक्ष भराभर वाढतात ती समुद्रातल्या नायट्रेट आणि कॅल्शियम मुळे तर हे कोण आणते वर्षानुवर्षे न चूकता या छोट्या छोट्या कणांना डोंगरावरच्या वृक्ष-गवताच्या रानफुलांच्या मुळाशी आणून देते? 'मासे' दरवर्षी समुद्रातून हजारो किलोमीटर लांब नद्या मघ्ये अंडी द्यायला येतात आणि तिथेच शिकार होतात किंवा नदीत बुडतात. या माशांमुळे हजारो टन नायट्रेट डोंगरात पोचते. जसे व्हिटॅमिन टॅबलेट, एक आख्खी परिसंस्था ह्या छोट्याशा माशाच्या परिक्रमेमुळे सुरू राहते. ते छोटे मासे समुद्रात परत जातात तेव्हा देखील व्हेल मासे त्यांच्यावर अवलंबून असतात नदीतल्या सत्वा साठी. एक छोटा मासा पण डोंगरातल्या वृक्ष वनस्पती फक्त नाही तर इथले अख्खे जग त्याच्या असण्याने घडते. त्यांच्या नसण्याने साखळी तुटेल.
मानव, प्राणी व पक्षी, झाडे, नद्या ही एकमेकांना पूरक साखळी आहे.
उदा. जसे तळे आहे तिथे सूक्ष्म जीव, कीटक, जल वनस्पती, बेडूक, मासे, पक्षी, साप राहतील. तिथे जलीय परिसंस्था तयार होईल. परंतु तापमान वाढले, प्रदूषण वाढले, लोकांनी पाणी काढले, गाळ वाढला, खाणी आल्या तर तेथील परिसंस्था नष्ट होईल. सर्व जीव नष्ट होतील किंवा काहीं जीवांना तिथून जावे लागेल. पृथ्वी हीसुद्धा एक मोठी परिसंस्था आहे.
Comments
Post a Comment